न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी होते. शरद पवार यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळेच महाविकास आघाडीचे सरकार आकार घेऊ शकले. त्यामुळे आता सरकार चालवताना आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांत समन्वय ठेवताना शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही याबाबतचा तिढा सुटलेला नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाला म्हणजेच १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या गोटात रंगू लागली आहे. त्यामुळे खरंच १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहावं लागेल.















