न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०१९) :- प्रभाग क्र. ३२ सांगवी – नवी सांगवी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते व विविध विकासकामे नियोजनबद्ध रितीने तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या. प्रभाग क्र. ३२ सांगवी – नवी सांगवी परिसरातील विविध विकासकामांबाबतची बैठक आयुक्त श्रावण हर्डीकर व प्रभागाचे नगरसदस्य हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे यांच्यासह सर्व विभागांच्या अधिकारी यांच्या समवेत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे आयोजित केली होती, त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, श्रीकांत सवणे, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, रामदास तांबे, उपअभियंता हेमंत देसाई, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, क्रिडा अधिकारी रझ्झाक पानसरे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे आदी उपस्थित होते.
प्रभागातील रस्त्यांच्या भूसंपादनाचे विषय तातडीने मार्गी लावून जागा ताब्यात घ्यावी. विविध रस्त्यांच्या विकासासाठी भूसंपादन करून मोजणी करणे व रस्ते विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या. तर त्यावर तातडीने नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.
नदीपात्रातील अनधिकृत झोपडपट्टीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नगरसदस्य हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे यांनी केली. पर्यावरण विभागाने अद्यापपर्यंत याबाबतची कोणतीही दखल घेवून कारवाई का केली नाही अशी विचारणाही त्यांनी केली. याबाबत अनधिकृत बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.
प्रियदर्शनी येथील मैदान विकसित करणे व कलम २०५ अंतर्गत विविध रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मोकाट कुत्री, डुकरे पकडण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. ज्या परिसरात अनियमित व दुषित पाणीपुरवठा आहे त्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या. सांगवी परिसरातील अनधिकृत नळजोडणीबाबत पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. धोकादायक वृक्षांबाबत उद्यान विभागाने तातडीने कार्यवाही करावी व नव्याने विकसित होणा-या रस्त्यावर पथदिवे लावणेबाबतची कार्यवाही विद्युत विभागाने तातडीने करावी अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.
नदीपात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून जलपर्णी तातडीने काढण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या. त्यावर मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी जलपर्णी काढण्याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.















