न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- केंद्र आणि राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांन सातवा वेतन आयोग लागू करण्यास तसेच फरकाची रक्कम जानेवारी महिन्याच्या वेतन बिलासोबत अदा करण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
स्थायीने घेतलेल्या या निर्णयाचे कर्मचारी महासंघाने स्वागत केले आहे. पिंपरी – चिंचवड महापालिककेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी पार पडली. या सभेत उपसूचनेद्वारे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी व त्या अनुषंगिक भत्ते लागू करण्याचा विषय मांडण्यात आला. कोणतीही चर्चा न करता या विषयाला मंजुरी देण्यात आली. ३० जानेवारी २०१९ च्या शासन आदेशान्वये १ जानेवारी २०२० पासून सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी व त्या अनुषंगिक भत्ते लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्या सेवा निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.












