- संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची भापकर यांची मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी व मध्यवर्ती भांडार विभागाच्या अधिका-यांच्या समन्वयाअभावी, निष्कीयता व कामातील हजगर्जीपणामुळे महापालिकेच्या आरोग्य व भांडार विभाग अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपैशा अधिक रकमेचे कीटक व जंतूनाशके कालबाह्य होऊन झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनास द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने वेळेत वापर न केल्याने एक कोटी एक लाख ६० हजारांची कीटक व जंतुनाशके कालबाह्य झाल्यामुळे फेकण्याची वेळ आली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आता ९१ लाखांची पुन्हा खरेदी केली आहे. आरोग्य विभागाच्या मागणीनुसार भांडार विभाग कीटकनाशके खरेदी करतो. मात्र ती वेळेत न वापरल्याने कालबाह्य होत असल्याचे भांडार विभागाचे म्हणणे आहे. कालबाह्य कीटकनाशकांबाबत भांडार विभागाकडून कळविले जात नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने जनतेचा पैसा वाया जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेव्दारे परिसरातील डास, डेंगीच्या अळ्या, कीटक, जंतू, यांचा संहार करण्यासाठी कीटक-जंतू नाशके खरेदी केली जातात. गटार, नाले, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त परिसरात फवारणीसाठी कीटकनाशके पावडर, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी औषधे खरेदी केली जातात. मात्र या औषधांच्या खरेदीनंतर त्यांचा वेळोवेळी वापर न केल्याने फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एक कोटी एक लाख साठ हजार रुपयांची कीटकनाशके कालबाह्य झाल्याने भांडार विभागात वापराविना पडून होते.
पावसाळ्यात कीटकनाशकांची मागणी असताना व आरोग्य विभागाकडे पुरेपूर साठा असतानाही त्याचा वापर केला गेला नाही. याबाबत पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले आरोग्य विभागाने मागणी केल्यानंतरच भांडार विभागाव्दारे कीटक जंतूनाशके खरेदी केली जातात. त्यामुळे आरोग्य विभागाने मागविलेली औषधे नियोजित वेळेत उपयोग करणे गरजेचे आहे. भांडार विभागाव्दारे शिल्लक जंतू कीटकनाशकाबद्दल वेळोवेळी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे. असे म्हणून भांडार विभाग व आरोग्य विभाग ऐकमेकांवर हे प्रकरण ढकलत आहे.
त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय अधिकारी व मध्यवर्ती भांडार विभागाच्या अधिका-यांच्या मध्ये योग्य समन्वयाचा अभाव,निष्कीयता व कामातील हजगर्जीपणामुळे महापालिकेच्या आरोग्य व भांडार विभाग अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपैशा अधिक रकमेच्या कीटक व जंतूनाशके कालबाह्य होऊन झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत जवाबदारांवर योग्य ती कारवाई व्हावी, असे या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे.












