- राष्ट्रवादी कार्यकर्ता ज्ञानेश्वर कस्पटे यांचे राज्यातील बळीराजासाठी योगदान..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे आज गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करीत असून, यंदाचा वाढदिवस पवार यांनी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त बळीराजाला समर्पित करण्याचे ठरविले. शरद पवार यांच्या हाकेला साद देत कस्पटे वस्ती परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माउली उर्फ ज्ञानेश्वर कस्पटे यांनी राज्यातील बळीराजाला आर्थिक मदत करण्याचे ठरविले.
त्या दृष्टीने पाऊले टाकत आज गुरुवारी (दि. १२) रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कस्पटे यांनी राज्यातील बळीराजासाठी २१०००/- रुपयांचा धनादेश राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष तथा आमदार हेमंत टकले व शिवाजीराव गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे, समीर कस्पटे, तानाजी अत्रे, सागर माने आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर कस्पटे म्हणाले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुष्पहाराऐवजी स्वयंप्रेरणेने त्या खर्चाचा निधी कृषी कृतज्ञता कोषसाठी योगदानाच्या रूपात द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. एक कार्यकर्ता या नात्याने त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, बळीराजासाठी अल्पसा कृतज्ञता निधी दिला. इतरांनीही राज्यातील बळीराजाला मदत करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आपण आपली संपूर्ण ताकद उभी करूया, असे आवाहन कस्पटे यांनी यावेळी केले.















