- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राम-लक्ष्मण जोडीला धमकीवजा इशारा ….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०१९) :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यांनतर प्रथमच माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज शनिवारी (दि. १४) रोजी पिंपरी चिंचवड शहरात नियोजित दौरा केला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधला.
आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, हनुमंत गावडे, योगेश बहल, दत्ता साने, मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, मयूर कलाटे, कार्यकर्ते संदीप काटे, ज्ञानेश्वर कस्पटे आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधताना म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांच्या नावाखाली अनेक वाढीव निविदा काढल्या आहेत. आता काळेबेरे दिसल्यास फिकिर करणार नाही. आता ‘आपले सरकार’ असून वाढीव कामांची, आजपर्यंतच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आमदारांनी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे अशी वाटणी करुन घेतली आहे. शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. टँकर माफियांच्या स्वार्थासाठी पाणीकपात केली आहे का? याची चौकशी करण्यात येईल. महापालिकेला सक्षम आयुक्त देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.