- आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणीचे निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर राज्य शासनाकडून लादण्यात आलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
नागपूर येथील राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या घरात असून, शहरातील अनधिकृत बांधकांची एकूण संख्या ८४ हजार ३७३ झालेली आहे. राज्य शासनाकडून दि. ८ मार्च २०१९ रोजी नगरविकास विभागाच्या निर्णयान्वये १ हजार चौरस फूटापर्यंतच्या ५६ हजार ७०३ निवासी बांधकामावर पूर्णपणे शास्तीकर आकारला जाणार नाही. तसेच, १ ते २ हजार चौरस फुटांपर्यंतच्या १४ हजार ७२६ निवासी बांधकांवर प्रतिवर्षी ५० टक्के दराने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. यासह २ हजार चौरस फुटांपुढील ३ हजार ४१४ निवासी बांधकामांवरील शास्तीकर मालमत्ता कराच्या दुप्पट आकारण्यात येत आहे. परिणामी, सर्व अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याबाबत शहरवासींयाकडून मागणी होत आहे. त्याचा विचार करून सर्व नागरिकांची शास्तीकरातून पूर्णपणे मुक्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.












