न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०१९) :- राज्यातील पोलिसांना अनेकदा गुन्ह्यांच्या तपासासाठी इतर जिल्ह्यात जावे लागते. त्यावेळी शिवशाही व शिवनेरी या परिवहन महामंडळाच्या विशेष गाड्यांमधून त्यांना प्रवासादरम्यान भाडे आकारण्यात येते. हे भाडे न आकारता सदर पोलीस पथकाला मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी सेनेचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
या संदर्भात दाखले यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटर आणि ई-मेलच्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात दाखले यांनी म्हंटले आहे की, गुन्ह्यांच्या तपासाकामी पोलिसांना अनेकदा इतर जिल्ह्यात जावे लागते. प्रवासादरम्यान त्यांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. विशेषतः प्रवासही त्रासदायक असतो. ही बाब लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलिन शिवशाही व शिवनेरी या वाहनांमधून या पोलीस पथकाला मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास पोलिसांना प्रवासादरम्यान थकवा जाणवनार नाही व त्यामुळे काम करताना त्यांचे मनोधैर्यही वाढलेले असेल, असे दाखले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















