- शहरातील प्रश्नांसंदर्भात घेतली आयुक्तांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका घेणारे माजी महापौर आझम पानसरे यांनी शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह मंगळवारी (दि. १७) महापालिकेत येऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. पानसरे यांनी महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
शहराच्या राजकारणात सक्रिय झाल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारमध्ये फेरबदल झाल्यानंतर नुकतीच (दि. १४) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात येऊन राष्ट्रवादीच्या नरगसेवकांसह महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची आकुर्डी येथे बैठक घेतली होती.
या बैठकीत त्यांनी शहरातील पाणी प्रश्नासह अन्य प्रश्रांमध्ये आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने मंगळवारी पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष व नगरेसवक डब्बू आसवानी आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या व वादग्रस्त वायसीएममधील ‘ पीजी ‘ भरतीचा गैरव्यवहार याबाबत आयुक्त हर्डीकर यांनी सविस्तर माहिती द्यावी. याबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच अजित पवार स्वत: पालिकेत आयुक्त व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यासाठी या विषयांवर तयारी करावी, अशा सूचना शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.












