न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले राजकीय पदाधिकारी, सहा मजले प्रशासकीय कामकाजासाठी आणि शेवटचा नववा मजला कर्मचाऱ्यांना जेवण करण्यासाठी असणार आहे.
शहराच्या नावाची ओळख सांगण्यासाठी पिंपळ, चिंच आणि वडाचे झाडदेखील लावण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आगामी अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. प्रस्तावित नवीन इमारतीच्या कामकाजाचे आज (मंगळवारी) पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.
महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.
याबाबतची माहिती देताना कार्यकारी अभियंता संजय घुबे म्हणाले, सध्याच्या इमारतीत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. प्रथम अंदाजपत्रक काढले जाईल. त्यानंतर निविदा प्रसिद्ध केली जाईल. सर्वांत कमी दराची निविदा स्वीकारून काम करण्यात येईल. या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर अडीच वर्षात इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्याच्या इमारतीचे नूतनीकरण करुन पुनर्वापर केला जाईल.












