- पोलिसच अवैध धंद्यात पार्टनर … परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील बावधन – बाणेर, हिंजवडी व जवळच्या ग्रामीण भागात परिसरात हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणाई यामध्ये अडकत आहे. यामुळे सुप्रीम कोर्टने हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी हिंजवडी परिसरातील मटका, जुगार, हुक्का, रातभर चालणारे पब, बियर बार याबाबत हिंजवडी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या परंतु, त्याना कसलंही प्रतिसाद भेटला नाही. त्यामुळे हिंजवडी परिसरातील काही नागरिकांनी अपना वतन संघटनेकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे.
नागरिकांनी सांगितले कि, हिंजवडी परिसरात पब, बियर बार, अवैध दारू, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय यांसारखे अवैध धंदे जोमात असून काही पोलिसच यामध्ये पार्टनर आहेत. त्या पोलिसांना राजकीय पाठबळ असून वरिष्ठांचे अभय आहे. त्यामुळे सर्रासपणे मोठ्या प्रमाणवर अवैध धंदे सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर पोलिसांमध्येच अंतर्गत कलह वाढले आहेत. हफ्ते वसुलीवरून काही दिवसांपूर्वीच पोलिसांमध्ये जोरदार खंडाजंगी झाली आहे. या हॉटेल्स बार मध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक रात्र -अपरात्री बेधुंध होऊन गाड्या चालवतात. त्यामुळे अनेक अपघात होतात.
तसेच येथी ल हॉटेल मधील डीजे चा आवाज रातभर चालू असतो. परंतु स्थानिक पोलिसांकडून हफ्ते घेऊन या सर्व बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा केला जात आहे. अशा प्रकारे पोलिसांकडूनच कायद्याची धज्जी उडवली जात आहे, अशी नागरिक तक्रार करीत आहेत. त्यामुळे हिंजवडी परिसरातील बेकायदेशीर पब, हॉटेल्स, बियरबार व अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व या अवैध धंदयांना अभय देणाऱ्या व या बेकायदेशीर धंद्यांमध्ये पार्टनरशिप असणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करून त्याना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अपना वतन संघटनेकडून मा. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास अपना वतन संघटनेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, वाकड विभागावर हजारोंच्या संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.












