- दौऱ्याच्या येणाऱ्या खर्चास स्थायीची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालय समितीचा राजस्थान दौरा आयोजिण्यात आला; तर महिला व बालकल्याण समितीने त्रिवेंद्रम दौऱ्याचे नियोजन केले आहे. यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि. १८) मान्यता दिली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘ फ ‘ क्षेत्रीय समिती सदस्यांनी राजस्थान दौरा आयोजिला आहे.
राजस्थानमधील जयपूर व उदयपूर महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळांची स्वच्छता आदी प्रकल्प समिती पाहणार आहे. या दौऱ्यासाठी प्रत्येक सदस्याला २९ हजार ९२५ रूपये खर्च येणार आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च ४ लाख ५० हजार रुपये आहे. या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, दौरा कधी काढणार ही तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे महिला व बालकल्याण समितीचा रद्द झालेला त्रिवेंद्रम दौरा २३ ते २४ डिसेंबरला आयोजित याचे केला आहे. त्यासाठी १ लाख ४० हजार रुपये खर्चासही स्थायी समितीने मंजुरी दिली. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजासंदर्भात त्रिवेंद्रम येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पूर्वी हा दौरा नोव्हेंबर महिन्यात होता. तो रद्द झाला आहे.
आता २३ व २४ डिसेंबरला आयोजित केला आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला कुटे, सदस्य भिमाबाई फुगे, अनुराधा गोफणे, उषा मुंढे, सुजाता पालांडे, साधना मळेकर, सुमन पवळे, निकिता कदम, अश्विनी चिंचवडे आणि लिपिक शुभांगी चव्हाण हे १० सदस्य सहभागी होणार आहे. मात्र, प्रत्येक सदस्याला १४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार १० सदस्यांना १ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे.















