- १९८६ पासूनच्या प्रलंबित एचसीएमटीआर राईट सल्लागार कंपनी आखनिमध्ये सुचवीले महत्वपूर्ण बदल…
- आमदारांच्या सूचनेचे स्वागत; गुरुद्वारा व रहाटणी (पश्चिम भाग) मधील घरे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा – विजय पाटील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड मनपाच्या हद्दीतील उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचे (HCMTR) विकसन करणेकरिता महत्वाच्या व नागरी हिताच्या सूचना महापालिका प्रशासनास पत्राद्वारे केलेल्या आहेत. त्यामध्ये १९८६ पासूनच्या प्रलंबित एचसीएमटीआर राईट सल्लागार कंपनी आखनिमध्ये त्यांनी महत्वपूर्ण बदल सुचविले असल्याची माहिती घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली आहे. तसेच सन्माननीय आमदारांच्या सूचनेचे स्वागत केले असून, आमदारांनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवून गुरुद्वारा परिसर व रहाटणी (पश्चिम भाग) मधील घरे वाचविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असेही म्हटले आहे. याबबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील नागरिक, रहीवाशी हे स्वतःच्या हक्कांच्या घरासाठी संघर्ष करीत आहेत. ३५०० पेक्षा जास्त घरे यामुळे बाधित होत आहेत, ४५००० पेक्षा जास्त नागरिक यामुळे रस्त्यावर येणार आहेत. या संदर्भात २६/११/२०१९ रोजी चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांनी माननीय आयुक्त यांना जावक क्रमांक – MLA 3/पिं चिं मनपा/2019/NOV/26/docx1 या पत्राद्वारे पिंपरी चिंचवड मनपाच्या हद्दीतील उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचे (HCMTR) विकसन करणेकरिता महत्वाच्या व नागरी हिताच्या सूचना केल्या. त्यामध्ये १९८६ पासूनच्या प्रलंबित एचसीएमटीआर राईट सल्लागार कंपनी आखनिमध्ये त्यांनी महत्वपूर्ण बदल सुचविले आहेत. त्यांच्या ह्या बदलांमध्ये मुख्यत्वे रहाटणी (पूर्व), थेरगाव, वाल्हेकरवाडी (बिजलीनगर/ चिंचवडेनगर), थेरगाव, पिंपळे गुरव मधील हजारो सामान्य व गोरगरिबांची घरे घरे वाचवण्यासाठी बदल सुचवले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावरील अनेक वर्षापासुन असलेली टांगती तलवार दूर करावी, असेही म्हटले आहे.

सदरचे पत्र आयुक्त कार्यालय, आवक क्रमांक १०८२८ क्रमांकाने नोंदणीकृत झाले आहे. त्यामुळे आता बी आर टी एस विभाग, स्थापत्य विभाग, तसेच ट्रान्सपोर्ट विभाग यांनी त्याचे पालन करणे आवश्यकच ठरते. या संदर्भात माहिती अधिकारी तथा उपअभियंता बीआरटीएस विभागाचे बापू गायकवाड यांनी माहिती अधिकार २००५ अन्वये घर बचाव संघर्ष समीतीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांना कळविले आहे. सदरचे आमदारांचे पत्र महापालिका विभाग अधिकारी ओंभासे, बापू गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सही करून स्वीकारले आहे व त्याबाबत आयुक्तांनी सूचनाही दिलेल्या आहेत.
या संदर्भात घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले,” आमदार लक्ष्मण जगताप यांनी उचललेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. अश्या पद्धतीने त्यांनी विशेष घटकांसही सूचित करावे म्हणजेच या एचसीएमटीआर प्रकल्पास मूर्त स्वरूप प्राप्त होईल. त्याचप्रमाणे हजारो बधितांची हक्काची घरे वाचतील. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे जनहीतार्थ प्रश्न सोडविलेले आहेत. अजून थोडं मोठे मन करून त्यांनी रहाटणी (पश्चिम) व गुरुद्वारा परिसरातील घरे वाचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. कासारवाडी, पिंपळे गुरव, थेरगाव, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील बाधितांच्या वतीने नक्कीच आमदारांच्या सुचनेचे स्वागत. परंतु, सुचनेचे पालन प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात म्हणजेच शासकीय अधिसूचनेत लवकरात लवकर व्हावे, अशी बधितांची इच्छा आहे. या सुचनेचे कोणत्याही नगरसेवक लोकप्रतिनिधी यांनी श्रेय घेऊ नये”, असे या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे.


















