न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपुलाच्या रॅम्पच्या सुमारे र. रु. १५ कोटीच्या कामाला दि.१८/१२/२०१९ रोजी मा. स्थायी समितीत सभापती, सत्ताधारी पक्षाचे सदस्य व विरोधी पक्षाचे सदस्य यांनी संगनमत करुन एकच निविदा असताना शासनाचे मार्गदर्शन व महापालिका कायद्याचे उलंघन करुन हे काम मंजूर करण्याचा प्रताप केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होणार असल्यामुळे या कामाला त्वरीत स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. महापालिकेतर्फे या कामासाठी १३ कोटी ९९ लाख ५७ हजार ६६८ रुपयांची ’लमसम’ निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांचीच निविदा सादर झाली होती. त्यांनी या कामासाठी १५ कोटी ८० लाख ५५ हजार ५४६ रुपयांची निविदा सादर केली होती.
त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त न झाल्यामुळे १५ मे, २१ जून आणि २८ जून रोजी दिलेल्या पत्राद्वारे त्यांना हे दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानुसार त्यांनी १५ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये इतका सुधारीत दर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८-१९ च्या दरसुचीनुसार टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टिल फरक आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत १६ कोटी २० लाख ४७ हजार ७२२ रुपये २५ पैसे इतकी येते. यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता.
मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांनी सादर केलेला दर १५ कोटी ७९ लाख ६३ हजार ३९ रुपये आहे. त्यामध्ये सुधारीत दर १५ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये, अधिक १६ लाख ९१ हजार ०६७ रुपये रॉयल्टी, २ लाख ९२ हजार ५२० रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस आणि शेड्यूल बी ११ लाख २९ हजार ४५२ रुपये याचा समावेश आहे. हा दर निविदा स्विकृतयोग्य १६ कोटी २० लाख ४७ हजार ७२२ रुपये २५ पैसे या रकमेशी तुलना करता २.५२ टक्क्यांनी कमी आहे.
त्यामुळे एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडूनच करून घेण्यात येणार आहे. काल दि.१८/१२/२०१९ रोजी मा. स्थायी समितीत सभापती, सत्ताधारी पक्षाचे सदस्य व विरोधी पक्षाचे सदस्य यांनी संगनमत करुन एकच निविदा असताना शासनाचे मार्गदर्शन व महापालिका कायद्याचे उलंघन करुन हे काम मंजूर करण्याचा प्रताप केला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेसची महाआघाडीचे सरकार असताना पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेसचीच आघाडी आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होणार असल्यामुळे या एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपूलच्या रॅम्पच्या र.रु. १५ कोटीच्या कामाला त्वरीत स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.


















