न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. शाहूनगर येथील आधार महिला मंडळ व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ”महिला डिजिटल” कार्यशाळेचे आयोजन शाहूनगर येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणात ३५० महिला सहभागी झाल्या होत्या.
या वेळी आधार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, महिला आयोगाच्या तज्ञ प्रशिक्षिका अर्चना दहिवाल उपस्थित होते.
मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे म्हणाल्या की, एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि ती आपल्या घराबरोबरच इतरही चार घरांतील महिलांना शिक्षित करते. म्हणूनच महिलांना खर्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे.
नगरसेवक केशव घोळवे म्हणाले की, डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे. अश्या कार्यशाळा घेऊन महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवता येईल.
डिजिटल साक्षरता म्हणजे रोजच्या जीवनात अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान समजण्याची आणि वापरण्याची कुठल्याही महिलेची, व्यक्तिची किंवा समाजाची क्षमता असल्याचे महिला आयोगाच्या प्रशिक्षिका अर्चना दहिवाल यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, या कार्यशाळेत प्रॅक्टिकल लर्निंगवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठी स्मार्टफोनसारख्या डिजिटल उपकरण व इंटरनेटचा कार्यक्षम वापर, यासोबत दैनंदिन उपयोगात येणारे ‘उमंग’, ‘आपले सरकार’, ‘ई-जीईएम’, ‘आयआरसीटीसी’, ‘डिजीलॅकर’ असे महत्त्वपूर्ण मोबाईल अॅप्स आणि डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम अॅप’, ‘फोन पे’ अशा अॅप्सचा उपयोग तसेच सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले आहे.


















