न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. १८) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ रुपेश सुरेश पाटील (वय २८, रा. भोसरी) असे अटक केलेल्या सराईत गन्हेगाराचे नाव आहे. संतोष पाटील याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.
अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाटील याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सतीष पाटील याच्यावर देहुरोड, चिंचवड, भोसरी या पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.












