- विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महापौरांची उपस्थितीही वेधणार लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी जोरदार सुरु आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनाचे हे सातवे वर्ष आहे. यावर्षी शाळेचे स्नेह संमेलन दोन दिवसांच्या सत्रांमध्ये विभागले जाणार आहे. उद्या शनिवारी (दि. २१) व रविवारी (दि. २२) रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार असून, या दरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
शनिवारी (दि. २१) रोजी सकाळी १०.०० वाजता शाळेच्या स्नेहसंमेलनाचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून, त्यांनतर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवात मुलांसाठी विविध प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील इतर शाळेतील मुलं व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकही यात सहभाग घेणार आहेत. स्पर्धा आटोपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक व सामूहिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ होणार आहे.
या दरम्यान रविवारी (दि. २१) रोजी सायं ५.०० वा. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकापेक्षा एक सरस देशभक्तीगीत, घुमर डान्ससह अनेक नृत्य प्रकार यात सादर होणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विविध कलागुणांना स्थान देत, आधुनिक जीवनशैली कशी आत्मसात करावी? यात आयुष्याशी निगडीत आनंदी जीवन, वैयक्तिक सबंध, सांस्कृतिक-धार्मिक पद्धती, योगा, संगीत आदी प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थी नयनरम्य कलाविष्कार सादर करणार आहेत.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, शाळेचे संस्थापक व उद्योजक संदीप काटे, युवा नेते निलेश काटे, पालक व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्यध्यापिका सुषमा उपाध्ये यांनी दिली.












