न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या आरोग्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (मेडिक्लेम) सारखी वैद्यकीय पॉलिसी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पिंपरी येथे केली.
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी १२ वर्षे आंदोलने करून संरक्षण कायदा मंजूर करून घेतल्याबद्दल एस एम देशमुख यांचा व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील पत्रकार कक्षात संपन्न झाला. यावेळी पिंपरी महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे व पुणे जिल्ह्यातील पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
एस एम देशमुख यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन महापौर माई ढोरे यांच्या शुभेहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, जिल्हा समन्वयक व हवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उर्फ नाना जगताप, सरचिटणीस सतिश सांगळे, कोषाध्यक्ष मनोहर तावरे, कार्यकारिणी सदस्य बाबा तारे, दादाराव आढाव, शिरूर तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संजय बाराहाते, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सोहळ्यास उत्तर देताना एस एम देशमुख म्हणाले की ” पत्रकारांना पेन्शन व संरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने झाली व मागील महिण्यात पत्रकार संरक्षण कायद्यावर शिक्का मोर्तब झाले. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळेच गेली १५ दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात सत्कार समारंभ आयोजित होत आहेत.
पत्रकारांसाठी संरक्षण कायदा मंजूर झाला याचे श्रेय महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे आहे. हा लढा मंजूर करण्यासाठी पनवेल ते वर्षा बांगला चार चाकी गाड्यांची रॅली, घंटानाद आंदोलन, आमदार खासदार यांच्या सह्याची मोहीम, काळ्या पट्ट्या बांधून निषेध, वर्तमानपत्रामध्ये निषेध, म्हणून काळ्या रंगाची चौकट छापणे इत्यादी विविध आंदोलने केली. यासर्व आंदोलनामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य व राज्यातील बहुसंख्य पत्रकार व संपादकांनी सहभाग नोंदविला. त्यामुळेच हा कायदा राज्य सरकारला मंजूर करावा लागला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाल्याने पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी झाले आहे.
एस एम देशमुख पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील सर्व घटकासाठी काम करतेय, पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक आहे त्यामुळे शहरात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मेडिक्लेम सारखी आरोग्य पॉलिसी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्याकडे केली आहे.
यावेळी एस एम देशमुख यांच्या पत्रकारांच्या आरोग्य पॉलिसी बाबत तत्वतः मान्यता देऊन यासाठी आवश्य पुढाकार घेऊ असे आश्वासन तिन्ही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडघुले यांनी व सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी केले तसेच आभार सरचिटणीस मारुती बाणेवार यांनी मानले.















