- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा आयुक्तांना इशारा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावर रॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाच्या खर्चासाठी येणाऱ्या सुमारे र. रु. १५ कोटीच्या खर्चास (दि. १८) रोजी स्थायी समिती सभापती, सत्ताधारी पक्षाचे सदस्य व विरोधी पक्षाचे सदस्य यांनी संगनमत करुन, एकच निविदा असताना निकोप स्पर्धा न करता मान्यता दिली आहे. त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन न घेता तसेच महापालिका कायद्याचे उलंघन करीत हे काम मंजूर करण्याचा उद्योग स्थायी समितीने केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होणार असल्यामुळे या कामाला त्वरीत स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे की, चिंचवड येथील एम्पायार इस्टेट समोरील उड्डाण पुलाला चिंचवडच्या बाजून चढण्या उतरण्यासाठी महापालिके तर्फे रॅम्प बांधण्यात येणार आहे. सदर रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. सदर रॅम्प बांधण्याचे काम करण्याकरीता केवळ एकाच ठेकेदाराने निविदा सादर केली व त्यास महापालिकेने मान्यता दिलेली आहे, असेही कस्पटे म्हणाले.
ही बाब विचार करण्याजोगी आहे. सदर रॅम्प बांधण्याकरिता मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांनी १५ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांची निविदा सदर केली आहे. परंतु, वास्तविक पाहता मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही निविदा सादर केलेली नाही. खरे पाहता स्थायी समितीच्या बैठकीमध्ये फेरनिविदा मागवणे गरजेचे होते. परंतु, तसे काहीही न करता स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या निविदेला मान्यता देण्यात आलेली आहे, असेही कस्पटे म्हणाले.
सदर रॅम्प बांधण्याचे काम करण्यासाठी फेरनिविदा मागवून घ्यावी व त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा मला आपणाविरुद्ध योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल, असे कस्पटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















