न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- खासगी वाटाघाटीने भूसंपादन करून मोबदला देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या प्रस्तावामुळे सत्ताधारी भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली. हा प्रस्ताव अनेकांचे आर्थिक नुकसान करणारा आहे. त्यावरून विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक विरोधात जाऊन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारची (दि. २०) तहकूब सभा काही मिनिटांत गुंडाळली.
महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिली सर्वसाधारण सभा होती. ती चर्चेविना श्रद्धांजली वाहून तहकूब केली गेली. सभेच्या विषयपत्रिकेवर खासगी वाटाघाटीसाठी कमी मोबदला देण्याचा प्रस्ताव होता. पालिकेने २० नोव्हेंबर २०१५ रोजी नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार ० ते ३०० चौरस मीटर जागामालकांना १०० टक्के मोबदला आणि ३०० चौरस मीटरपेक्षा अधिक भुखंड असलेल्या जागामालकांना ३० टक्के मोबदला पालिकेकडून दिला जात होता. त्यामध्ये खासगी वाटाघाटीने भूखंडाचे तुकडे पाडून जागामालकांना लाभ दिला जातो.
परंतु, त्यात बदल करून २० नोव्हेंबर २०१५ भूखंडाचे तुकडे केलेल्या जागामालकांना मोबदल्याची रक्कम ३० टक्के इतकीच देण्याचा बदल स्थायी समितीने केला. त्यावरून स्थायी समितीच्या सभेत अनेक वेळा वाद झाले. हा प्रस्ताव पालिका सभेसमोर होता. मात्र, सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पार्टी मीटिंगमध्ये या प्रस्तावाला विरोध केला होता. नगरसेवकांनी या विषयावरून परखड भूमिका मांडली होती. अनेक नगरसेवक आक्रमक असल्याने सभेत त्यावरून गोंधळ होणार असल्याची स्थिती होती. तसेच, वाद झाल्यास सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद सभागृहात उघड होणार होता. त्यामुळे तूर्तास भाजपने सभा तहकूब करून हा वाद टाळला. दरम्यान देशभरातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मांडला. त्यास नगरसेवक हर्षल ढोरे यांनी अनुमोदन दिले. त्यावर महापौर ढोरे यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. ही तहकूब सभा ६ जानेवारीला दुपारी दोनला आयोजिली आहे.















