न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- मोशी येथील पुणे – नाशिक महामार्गालगतचा पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेचा कचरा डेपो विरोध असतांनाही सुरु करण्यात आला. आज तो स्थानिकांच्याच मुळावर येत आहे. रोज सायंकाळी सुटणारा उग्र वास, दिवसभर शेतांमधून, घरासमोरून फिरणारी कचरा डेपोतून आलेली भटकी कुत्री, डुकरे, आरोग्याच्या उद्भवलेल्या समस्या असे चित्र सध्या या परिसरात आहे. हा त्रास केवळ कचरा डेपोच्या शंभर मीटर पर्यंत राहिला नसून त्याने अर्ध्याच्यावर मोशी गाव परिसर काबीज केला आहे. असाच त्रास होऊ लागल्यास आम्ही आमची शेती, घरदार सोडून परागंदा व्हायचं का, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.
कचरा डेपोत पूर्वी पाच टन कचरा टाकला जात होता, आता त्याची व्याप्ती अकरा टनापर्यंत गेली आहे. नागरिकांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोशीमध्ये कचरा डेपो सुरू केला. परंतु, हा डेपो स्थानिक व मोशीकरांच्या दृष्टीने समस्या बनल्याची सध्याची अवस्था आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. डेपोच्या दुर्गंधीने कायम परिसरातील नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींवर होत आहे.
दुर्गधी ही सुरुवातीला केवळ गंधर्वनगरी, आदर्शनगरपुरतीच मर्यादित होती. मात्र सध्या ती मोशीतील बो-हाडेवाडी, पुणे नाशिक हायवे, हजारे वस्ती, बनकर वस्ती शेती परिसरात येऊ लागल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुणे – नाशिक महामार्गावरुन जाताना नागरिकांना अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. सायंकाळ होताच दुर्गंधी पसरते. परिसरातील सदनिका धारकांचेही जगणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावर मध्यंतरी कमी झालेली दुर्गंधी अधिक वाढण्यामागचे कारण शोधून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.















