न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव वेगातील डंपरने धडक दिली. त्यानंतर डंपर पलटी होऊन महिलेच्या अंगावर पडला. यात महिलेचा मृत्यू झाला. नाशिकफाटा येथे शनिवारी ( दि. २१ ) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल अर्जुन बानगुडे (वय ४५, रा. आंधळे, ता. मुळशी, जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल बानगुडे शनिवारी त्यांच्या नातेवाईकांकडे जात होत्या. नाशिकफाटा येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील डंपरने त्यांना धडक दिली. त्यानंतर डंपर पलटी झाला. डंपर अंगावर पडल्याने बानगुडे यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












