न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- मध्यरात्री काम करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २१) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या काळेवाडी शाखेसमोर घडली.
महेश पांडुरंग भागवत (वय ३५) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश महावितरणमध्ये तंत्रज्ञ पदावर नोकरीस आहेत. ते महावितरणच्या काळेवाडी शाखेत कार्यरत असून हे कार्यालय कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर येथे आहे. शनिवारी मध्यरात्री महेश कार्यालयासमोरील पोलला अर्थिंग करत होते. त्यावेळी कारमधून (एम एच १४ / एच डब्ल्यू ६२१७) दोन अनोळखी इसम आले. त्यांनी महेश यांच्या हातातील शॉर्ट रॉड हिसकावून फेकून दिला. हाताने मारहाण केली आणि कारमधून पळून गेले. यामध्ये महेश जखमी झाले. महेश करीत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


















