न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. २२) मोर्चा काढण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत विधेयकाचे स्वागत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संविधान वाचन करण्यात आले. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेता एकनाथ पवार, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास माडीगिरी, नगरसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे दोन हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.
‘वी सपोर्ट सीएए’, वंदे मातरम’, ‘वंदे मातरम का नारा है, निर्वासित हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन हमारा है’ अशा घोषणा देऊन सीएए कायद्याचे समर्थन करण्यात आले. तिरंगा, भगवा झेंडा हाती घेऊन कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ घोषणा दिल्या.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘या कायद्याविरोधात विद्यार्थ्यांना पुढे केले जात आहे. त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कायद्याला विरोध नाही तर त्याचे समर्थन करणे आवश्यक आहे.’


















