- स्पर्धेच्या माध्यमातून सोसायटीत एकोपा अबाधित रहावा यासाठी छोटासा प्रयत्न – नगरसेवक शैलेश मोरे…
- एम्पायर इस्टेटमध्ये ‘एम्पायर प्रिमियर लीग (EPL) क्रिकेट स्पर्धेचा समारोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियाच्या कृत्रिम विश्वात जगत असलेल्या पालकांना व त्यांच्या मुलांना मैदानी खेळाची गोडी लागावी आणि रहिवाशांमधील मैत्री अधिक वृद्धिंगत व्हावी, या हेतूने नगरसेवक शैलेश मोरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट या गृहनिर्माण सोसायटीत चक्क ‘क्रिकेट’चा आधार घेतला आहे. नगरसेवक मोरे यांच्या वतीने रहिवाशांसाठी गेल्या काही वर्षांपासून ‘आयपीएल’च्या धर्तीवर ‘एम्पायर प्रिमियर लीग (EPL) ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. नुकताच या स्पर्धेचा समारोप झाला.
या क्रिकेट स्पर्धेत सोसायटीतील संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. त्यामुळे या स्पर्धेला क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या स्पर्धेअंतर्गत सोसायटीत राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलांसह ६० वर्षांचे आजोबा देखील रंगीबेरंगी जर्सी घालून मैदानात उतरले होते. अन् क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटत होते.
नगरसेवक शैलेश मोरे आयोजित ‘एम्पायर प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेत पुरुषांचा वेगळा तर, महिलांचा वेगळा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत महिला गटातील अंतिम सामना फेडरेशन २ विरुद्ध फेडरेशन ३ यांच्यात रंगला. महिलांच्या अंतिम सामन्यात फेडरेशन २ हा संघ विजयी ठरला. महिलांच्या संघातील ओनर ऑफ द सिरीज हा किताब श्वेता आनंद या महिला खेळाडूला मिळाला. तर, पुरुषांमध्ये अंतिम सामना सी विरुद्ध क्यू यांच्यात रंगला. पुरुषांचा अंतिम सामना बरोबरीत सुटला. मॅन ऑफ द सिरीज व बेस्ट बॉलर हा किताब महेश कोरे तर, उत्कृष्ट फलंदाजाचा किताब शाम बिष्णोई या खेळाडूंना मिळाला.

अंतिम सामन्यातील विजेत्या महिला संघास व पुरुषांच्या दोन्ही संघास तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू व उपविजेत्या संघाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी आयोजक नगरसेवक शैलेश मोरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी खेळाडू व एम्पायर इस्टेटमधील सर्व नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या की, सध्याचे पालक सोशल मीडिया, लॅपटॉप, टीव्ही-मोबाइलच्या कृत्रिम विश्वात अडकून पडतात. त्यामुळे मुले मैदानी खेळांपासून परावृत्त होतात. त्यांच्यात मैदानी खेळांची रुची निर्माण व्हावी, यासाठी क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेनिससारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. एम्पायर इस्टेट ही सोसायटी या बाबतीत जागृत आहे. त्यामुळे त्यांचे काम अभिनंदनास पात्र आहे.
नगरसेवक शैलेश मोरे आभार प्रकट करताना म्हणाले की, एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये रहिवाशांसाठी गेल्या काही वर्षांपासून ‘आयपीएल’च्या धर्तीवर ‘एम्पायर प्रिमियर लीग (EPL) ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत सोसायटीतील आबालवृद्ध आवडीने सहभागी होतात. स्पर्धांमुळे सर्व रहिवाशांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली असून, बंधुत्वभावना वाढली आहे. त्यामुळे कोणीही अडचणीत असले, तरी सर्व जण मदतीला धावून येतात. या पुढेही अशा स्पर्धेच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांचा एकोपा अबाधित रहावा, यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.















