- अर्धकुशल कामगारांकडून नागरिकांची पिळवणूक
- संबधित ठेकेदारावर कारवाईची संतोष सौंदणकर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- महावितरण कंपनीने वीज मीटर बदलण्याबाबतचे काम ठेकेदाराला दिले आहे. या ठेकेदाराकडून वीज मीटर बदलण्याचे निकष पाळले जात नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या कामाचा ठेका रद्द करावा, अशी मागणी विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे. याबाबत सौंदणकर यांनी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ”महावितरणच्या तीनही मंडल कार्यालयांच्या हद्दीतील जुने सिटी ऑपरेटेड वीज मीटर काढून, त्याऐवजी ४० / २०० अॅम्पियर L मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, हे काम मिळालेल्या ठेकेदाराकडून हे काम उपठेकेदाराला देण्यात आले आहे. या उप-ठेकेदाराकडे कुशल मनुष्यबळ नसल्याने, मीटर बसविताना कोणतेही निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे या सर्व कामाची तपासणी महावितरणाच्या अ गुणवत्ता नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांमार्फत करावी.
या कामाकरीता आवश्यक असलेले विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्रदेखील या ठेकेदाराकडे नाही. अकुशल कामगारांकडून नागरिकांना अनेक प्रकारचे साहित्य आणायला लावले जात असून, अनेक ठिकाणी पैशांची देखील मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिक दबक्या आवाजात करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी तत्परतेने लक्ष घालून संबंधित ठेकेदार करवाई करावी, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.















