न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आल्याने शिक्षण हक्क कायद्यानुसार दोन्ही विभागाचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या आज (शनिवारी) तहकूब पाक्षिक सभेत आयत्या वेळी मंजुरी देत, प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविण्यात आला आहे.
सभापती मनिषा पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. प्राथमिक विभागाच्या १०५ आणि माध्यमिक विभागाच्या १८ अशा एकूण १२३ शाळा आहेत.
महापालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने एकत्रित करण्यात यावा, असा ठराव समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही विभाग आता शिक्षण समितीच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.















