न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीची तहकूब सभा आज (शनिवारी) पार पडली. मनीषा पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेत पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व कर्मचा-यांच्या मानधनात दोन हजार रुपयांच्या वाढीस मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेकडे पाठविण्यात आला आहे.
सध्याच्या महागाईचा विचार करता त्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव सदस्या सुलक्षणा धर यांनी मांडला. त्याला निर्मला गायकवाड यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिली आहे. पाच वर्षांपर्यंत सेवा झालेल्या शिक्षिकेला सध्या सात हजार रुपये मानधन असून, त्यांना आता नऊ हजार रुपये मानधन मिळणार आहे.















