न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू प्रतिनिधी :- देहूगावाची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक असून संतांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले देहू हे ‘अ’ दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रास महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील भावीक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
देहूमध्ये संस्थान व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत अंदाजे १८५ कोटी रु. निधी या विकासकामास मंजूर झालेला असून काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या ठिकाणी प्रतिवर्षी तीन यात्रांचे आयोजन केले जात असून, पुणे व राज्यातील लाखो भाविक श्रींच्या दर्शनास गर्दी करतात.
परिसरात प्रचंड प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार व देहू ग्रामसभेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
लवकरच मंत्रिमंडळात ठराव करून प्रशासनाची बैठक घेऊन, देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये वर्गीकरण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळास यावेळी दिले.
यावेळी आमदार संजय भेगडे, श्री. क्षेत्र पंढरपूर संस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, इतिहास संशोधक व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मा. पंचायत सदस्य बाळासाहेब काळोखे, मा. सरपंच मधुकर कंद, देहूरोड शहर भाजपचे अध्यक्ष कैलास पानसरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे आदी उपस्थित होते.
















