न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णाचे संपूर्ण बील माफ करण्याचा निर्णय महापालिकेने ऑक्टोबर २०१९ मध्ये घेतला आहे. परंतु, आजतागायत सर्व रुग्णालयास त्याबाबतचा आदेश पोहचला नाही. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे बील वसूल केले जात आहे. बील माफ करण्याच्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी आधार सोशल फाउंडेशनचे विकास भुंबे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएमबरोबरच शहराच्या विविध भागांत रुग्णालये चालविली जातात. या रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर सामान्य दरात उपचार केले जातात. महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशातच रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, हे बिल आवाक्याच्या बाहेर असते. बील भरण्याची त्याची ऐपत नसते. त्यामुळे महापालिकेने बील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, आजतागायत सर्व रुग्णालयास त्याचा आदेश पोहचला नाही. त्यामुळे बील घेतले जात आहे. त्यामुळे बील माफीचा आदेश महापालिकेच्या रुग्णालयाला द्यावेत. त्यामुळे बील आकारले जाणार नाही, अशी मागणी भुंबे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
















