न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वत्र राबविला गेला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडताना दिसत नाही. हिवरे बाजारने हा ताळेबंद मांडल्याने दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. पर्यावरण विषयावरही भर दिल्यास विद्यार्थ्यांनाही वास्तवाची जाणीव होण्यास चांगली मदत होणार आहे, असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
पोपटराव पवार यांनी मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी यावेळी हिवरे गावाच्या वैशिष्टय़ांची उकल विद्यार्थ्यांसमोर केली. त्यांच्या या यशस्वी वाटचालीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलाम केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, विलास काळोखे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मुकुंद खळदे, निरुपा कानिटकर, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, संजय साने, नंदकुमार शेलार आदी उपस्थित होते. दरम्यान, विविध क्रीडास्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी जागवत भाषणाला सुरुवात केलेल्या पोपटराव पवार यांनी ठरवले असते, तर मोठा क्रिकेटपटू झालो असतो, असे सांगत हिवरे बाजारचे सरपंच अपघाताने झालो आणि सुंदर, सुसंस्कृत गाव बनविण्यात यशस्वी झालो, असे सांगितले. ते म्हणाले, की आनंददाई आणि आदर्श गावाची प्रगती पाहण्यासाठी जगातील लोकांची येथे गर्दी होते. मात्र, १९९० पूर्वी गावाची भयानक परिस्थिती होती. जेमतेम साडेतीनशे-चारशे मिलिमीटर पाऊस. त्यात पावसाळी पिकं थोडीफार घेतली जायची. जमिनीची धूप, पिण्याच्या पाण्याचं दुर्भीक्ष्य, जनावरांचा चारा उपलब्ध नव्हता, ना जळणासाठी लाकूड, अशा परिस्थितीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. हाताला काम नाही, त्यातून गुन्हेगारी वृत्ती वाढली होती. व्यसनाधीनता बळावली होती. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. तो काही लोकांचा उत्पन्नाचा मार्ग झाला. दारूमुळे होणारे सर्व वाईट परिणामही दिसू लागले. हिवरेबाजारचे नाव यामुळे खराब झाले होते. सरकारी खात्यातल्या ज्याची कोणाची हिवरेबाजारला बदली व्हायची, त्याला ती ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ वाटे. शिक्षणाचा अभाव, आरोग्यविषयक गोष्टींचा अभाव. दारूच्या एका बाटलीवर गावातली लग्नं जमत, असे वास्तव पवार यांनी उलगडून दाखविले. मोबाइल, इंटरनेट पुढील पिढ्यांना देताना त्याच्या वापरासाठी योग्य संस्कारही देण्याची गरज आहे; अन्यथा नैराश्यातून व्यसने जडण्याचा मोठा धोका आहे, असेही त्यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले, की आज जगभर पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ३००-४०० फुटांच्या पुढे भूगर्भातील पाणीपातळी गेली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी अवलंबलेली जलनीती राबविणे आवश्यक आहे. आज ज्या भागात जास्त पाऊस पडतो, त्याच भागात पाणीटंचाई दिसते आहे. योग्य नियोजन करून पाण्याचे पुनर्भरण करता येते, ते करणे काळाची गरज आहे. पावसाच्या पाण्याबरोबर अमाप माती वाहून जाते. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुनर्भरणासोबतच मातीसंवर्धन करणेही निकडीचे आहे. वनसंपदा जपली पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी निरोगी व निर्व्यसनी राहावे. प्रेरणेला कृतीची जोड दिल्याशिवाय नीती व मूल्ये जपता येत नाहीत, असा सल्ला देत विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारत बोलते केले.
गावात एकही पुतळा नाही, शाळेतील मुले आणि गावकरी मिळून गावाची स्वच्छता करतात. आम्ही गावकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन आणि नियोजनामुळे गावचा पाणी, माती, पर्यावरण अशा सर्वच पातळ्यांवर केलेला विकास पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहल काढून हिवरेबाजारला आवर्जून यावे, असे निमंत्रण पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले.












