- स्वी. नगरसेवक यादव यांच्या पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांना मिळणार घरकुल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यापर्यतचा रस्ता JNNURM अंतर्गत विकसित करणेत आलेला आहे. या रस्त्यामधील उड्डाणपुलाच्या कामासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यामधील बाधीत मिळकतधारकांना आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी बांधण्यात येत असलेल्या ( EWS ) घरकुल योजनेत घर देणेबाबत मनपाचे धोरण निश्चित झाले आहे. त्या अनुषंगाने या बीआरटी रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकत धारकांचे सर्वेक्षण झोनिपु विभागामार्फत सन २०१० मध्ये करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणामधील बाधित लाभार्थ्यांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या यादीत कुदळवाडीतील बाधित लाभार्थींचा घरकुल योजनेमध्ये समावेश न होता लाभार्थी या लाभापासून अजूनही वंचित आहेत. कुदळवाडीतील बाधित लाभार्थ्यांचा घरकुल योजनेमध्ये समावेश करीत त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिकेकडे व महापौरांकडे केली होती. तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनाही याबाबत लक्ष पुरविण्याबाबतची विनंती केली होती.
यादव यांच्या मागणीची दखल घेत, आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागाची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत संबंधित विभागास फैलावर घेत, काळेवाडी फाटा ते देहु आळंदी बीआरटीएम रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या कुदळवाडीतील लाभार्थ्यांना मनपाकडुन अद्याप घरकुलमध्ये लाभ का मिळाला नाही याची विचारणा केली. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी बीआरटी विभागाकडुन झोनिपु विभागाकडे प्रस्ताव पाठवावा अशी सक्त ताकीद बैठकीत केली होती. त्यामुळे प्रशासन कामाला लागले असून, तसा पत्रव्यवहार स्थापत्य विभागाकडून झोनिपू विभागाकडे सुरु झाला आहे.
स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थापत्य बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी झोनिपू विभागाकडे उर्वरीत लाभार्थ्यांचा घरकुल योजनेत समावेशासाठी धोरणानुसार कार्यवाही करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे तत्वतः या विषयास महापालिका प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच कुदळवाडीतील उर्वरित लाभार्थ्यांना घरकुल मिळणार असून, हा प्रश्न जोपर्यंत तडीस जात नाही तो पर्यंत मी सतत पाठपुरावा करीत राहणार आहे.















