न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- जमिनीच्या व्यवहारात बनावट कागदपत्र तयार करून सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
रिषभ पुखराज भंडारी (रा. लॉ कॉलेज रोड, पुणे), प्रमोद मिश्रीलाल धाडीवाल (रा. मालती को. ऑप. सोसायटी, पुणे), शांताराम जगन्नाथ बर्डे (रा. बिरमल नगर, पुणे), महेश टी. क्रिपलानी (रा. पिंपरी), प्रकाश बी. कांबळे (रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
विजयकुमार गोपीचंद रामचंदानी (वय ५० , रा. पिंपळे सौदागर) यांनी रविवारी (दि. २६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ डिसेंबर २००६ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. आरोपी क्रिपलानी व कांबळे यांनी पिंपळे सौदागर येथील ११९ गुंठे जमीन २५ लाख १२ हजार ८०० रुपये घेऊन २०१० मध्ये खरेदीखत करून दिले. त्यापूर्वी २००१ व २००६ मध्ये जमिनीचे मूळ मालक हयात असताना २००६ मध्ये डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट रजिस्टर असताना एकाच मिळकतीचे दोनदा बनावट खरेदीखत केले.
में. श्रद्धा असोसिएट यांच्या वतीने भागीदार रिषभ भंडारी, प्रमोद धाडीवाल आणि शांताराम बडे यांनी कुलमुखत्यारधारक कांबळे व क्रिपलानी यांनी आपसांत संगनमत करून जमिनीच्या सातबारामध्ये फिर्यादी रामचंदानी यांचे नाव रजिस्टर झालेले असतानाही मूळ मालक २००७ मध्ये मयत असताना २०११ मध्ये एकतर्फी डीड ऑफ डिकलेशन रजिस्टर केले. तसेच जमिनीच्या सातबारामध्ये फिर्यादी रामचंदानी यांचे नाव कमी केले. मे. श्रद्धा असोसिएट यांच्यावतीने भंडारी, धाडीवाल आणि बर्डे यांचे नाव लावून रामचंदानी यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्यादी सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे.