- आ. महेश लांडगे यांचा पुढाकार
- पुतळा उभारणीसाठी महापालिकेने घेतली निविदा पूर्व सभा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी पुतळा उभा करण्यात येणार आहे. आ. महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून व हा पुतळा उभा रहात आहे. त्यामुळे शंभूराजांचा व देशातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहे. या पुतळ्याचे शिल्पकार होण्यासाठी देशातील मानांकित शिल्पकारांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये गुजरात येथे ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार यांचाही समावेश आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात बो-हाडेवाडी येथे सुमारे अडीच एकरमध्ये १०० फुट उंचीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा व ४० फुटी चौथरा व संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित म्युरल्सद्वारे जीवनपट उलगडण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा २० फुटी पुतळा उभा करण्यात येणार आहे. हे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे.
या कामासाठी निविदा पूर्व सभा पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही निविदा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे समजते. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फुटी पुतळा साकारण्यासाठी अनेक शिल्पकार पुढे आले आहेत.
या निविदापूर्व सभेत गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी व इंदु मिल मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३५ मीटर, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा २१२ मीटर तसेच आयोधेतील रामाचा २५१ मीटर उंचीचा पुतळा बनविणारे राम सुतार, यांसह महाराष्ट्रातील नामांकित अनेक शिल्पकारांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.












