न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- युनियनची स्थापना केल्यामुळे भोसरी येथील वेलमेड लॉकिंग सिस्टम कंपनी व्यवस्थापनाने ३६ कामगारांना बडतर्फ केले. कंपनी व्यवस्थापनाने आमच्यावर अन्याय केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.
कामात हलगर्जीपणा करणे, कामावर न येणे, पत्र देऊनही दुर्लक्ष करणे या कारणांमुळे कामगारांवर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली.
भोसरी एस ब्लॉकमधील वेलमेड लॉकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगार २९ मे २०१९ पासून संपावर आहेत. न्यायासाठी कामगांरानी तत्कालीन कामगार मंत्र्यांकडे गा-हाणे मांडले. मात्र, काहीच कार्यवाही झाली नाही. याबाबत न्यायालयातही याचिका प्रलंबित आहे.
कामगारांनी बेमुदत संप मागे घेऊन कामावर यावे, या बाबत कंपनी व्यवस्थापनाने सातत्याने पत्रव्यवहार केला. संप मागे न घेतल्याने संबंधीत कामगारांवर चौकशी समितीद्वारे कायदेशीर कारवाई केली, असे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांना बुधवारी (दि. ४) भेटणार असल्याचे कामगारांनी सांगितले
कंपनी व्यवस्थापनाने ३६ कामगारांना बडतर्फ केले आहे. कामगारांना तसे पत्रही दिले आहे. आम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवणार आहोत. तसेच संबंधीत मंत्र्यांना भेटून आमच्या मागण्या मांडणार आहोत.
– विनोद जाधव, सरचिटणीस, वेलमेड लॉकिंग एम्प्लॉईज युनियन.















