- यापुढे महापालिकेच्या निमंपात्रिकेत अजितदादांचे नाव हवेच – नाना काटे
- भाजपने लेखी माफीनामा मागावा. अन्यथा सर्वसाधारण सभा होऊ देणार नाही – साने
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटने वेळोवेळी होत असतात. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार जिल्हाचे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवकांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकली जातात. राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. परंतु, महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर अद्याप राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. याबाबत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले आहे.
नाना काटे म्हणाले की, राज्यात जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना राजशिष्टाचारानुसार तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेत त्यांचे नाव टाकले जात होते. परंतु, आता राज्यात सत्ता बदल झाला असताना भाजपाचे पदाधिकारी हा मोठेपणा दाखवत नाहीत. त्यामुळे आम्हाला पालकमंत्र्याचे नाव महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत समावेश करण्याबाबत पत्र द्यावे लागते, ही खेदजनक बाब आहे. यापुढे महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राजशिष्टाचारानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकण्यात यावे. तसेच महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजने, उद्घाटने व विविध कार्यक्रमाची निमंत्रणे पालकमंत्र्यांना पाठवावीत.
दत्ता साने म्हणाले की, महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे शहरातील पालकमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख मुद्दामून भाजपने निमंत्रण पञिकेत टाळला. याबाबत मी थेट महापौर कार्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचे निलंबन करण्यात यावे आणि सत्ताधारी भाजपने लेखी माफीनामा मागावा. अन्यथा पालिकेतील सर्वसाधारण सभा चालूच देणार नाही, अशी चेतावणी देखील त्यांना यावेळी दिली.