न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे पिंपरीतील एका सावकाराने महिलेच्या पतीला मारहाण करुन तिच्या मुलाला जिवंत जाळण्याची धमकी दिली व महिलेला अश्लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला.
हा प्रकार २५ मे २०१५ ते ३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत घडला. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सतेज एकनाथ नाणेकर, रा. वाघेरे हाईट्स, पिंपरीगाव या सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी आरोपी सतेज नाणेकर याच्याकडून ३० हजार रुपये २० टक्के व्याजाने घेतले होते. दर महिन्याच्या १ तारखेला ५ हजार रुपये व व्याज असे हे पैसे देण्याचे ठरले होते. परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेस फिर्यादी महिला आरोपी नाणेकर याला ठरल्याप्रमाणे पैसे व व्याज देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे, आरोपी नाणेकर याने फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तिचा मुलगा संकेत यास जाळून टाकीन, अशी धमकी दिली व फिर्यादी महिलेशी अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला.