न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- लोकसंख्यावाढ, वाढती वाहने, वाढते उद्योगधंदे यामुळे पर्यावरणावर ताण येऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.
पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यातर्फे वनराई संस्थेच्या सहकार्याने ऑटोक्लस्टर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, संमेलनाचे विशेषाध्यक्ष टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, स्वागताध्यक्ष डॉ. अभय कुलकर्णी, आयोजक विकास पाटील, प्रदीप वाल्हेकर, निलेश लोंढे, धनंजय शेडबाळे, विठ्ठल वाळुंज, मकरंद टिल्लू, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, पर्यावरण संवर्धनाची गरज, उपाय विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत आणि पोवाड्यातून स्पष्ट केले.
महापौर ढोरे पुढे बोलताना म्हणाल्या, पर्यावरण शब्द वाचला तरी लोकांना पर्यावरण संकल्पना लक्षात येते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नदीपात्रातील वाढती जलपर्णीही चिंतेचा विषय आहे. त्याचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. इसीए, महापालिका आणि वनराई यांच्या संयुक्तपणे आयोजित या संमेलनातून पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश समाजात जाईल.
डॉ. अय्यर यांनी सांगितले, की आज सामाजिक पर्यावरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पिण्यायोग्य पाण्यात कोणतेही घातक घटक मिसळू नयेत. जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. आरोग्याला घातक असलेले टॉक्सिक केमिकल मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळले जाते. वाढत्या वाहनसंख्येमुळे, उद्योगधंद्यामुळे हायड्रोकार्बन हवेत मिसळला जातो, जो आरोग्यास खूप घातक आहे.
संमेलनाचे विशेषाध्यक्ष मनोहर पारळकर म्हणाले, आज एसी ही गरज बनली आहे. याला वेळीच आवर घातला नाही, तर आपण पुढच्या पिढीचे मारक ठरणार आहोत. ऐशोरामी गोष्टींचा उपयोग कमी करण्याची गरज आहे. साधं जीवन जगणे ही काळाची गरज आहे. तरच चांगले दिवस येतील. स्वतःपासून सुरुवात केली तरच पर्यावरण रक्षण शक्य आहे.
मकरंद टिल्लू यांनी सांगितले, की आतापर्यंत लोकांना हसवता हसवता गळके नळ दुरुस्त करून शंभर कोटी लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवले आहे. जिथे त्रास सुरू होतो, तिथे उपाय सुचतात. या कल्पनेने पाणी वाचवले. आज शहरात पाण्याबाबत जनजागृती करीत असताना आम्ही ग्रामीण भागातील गळके नळ दुरुस्ती करून जनजागृती करीत आहोत. कारण आपण आईच्या पोटात असल्यापासून आपला पाण्याशी संबंध आहे. त्यामुळे पाणी वाचविले, तरच पर्यावरण वाचेल.
संजय कुलकर्णी यांनी महापालिकेची पर्यावरण साहित्य संमेलनातील भूमिका विशद केली. डॉ. कमलकांत वढेलकर यांनी पर्यावरण संवर्धनात माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे सांगितले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, आपली घरे स्वच्छ ठेवताना बाहेरचा परिसर अस्वच्छ करतो, हा मोठा पर्यावरणीय वाद आहे. वाडा संस्कृती नष्ट होणे, हाही पर्यावरणाचा ऱ्हास आहे. पर्यावरण रक्षण एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. हा अंतर्विरोध वाढत आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी विरोध हा होतच असतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. जगण्यायोग्य शहरे घडवायची असतील, तर अंतर्विरोध स्वीकारावा लागेल.
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले. तसेच पर्यावरण साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट करीत पर्यावरण रक्षणासाठी अनेकांनी पुढे येण्याची आवश्यकता बोलून दाखवली.











