न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यावेळी महापालिकेतील गैरकारभारावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जे काही कंत्राट निघत आहे. त्यामध्ये गोलमाल आहे. गेली तीन वर्ष महापालिकेत भाजप सत्तेत येण्यापूर्वी आरडाओरड करत होते. त्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बोकाळल्या आहेत. प्रत्येक निविदेमध्ये काहीतरी गोंधळ आहे. निविदेच्या अटी शर्ती बदलल्या जात आहेत. शहरवासीयांच्या कररुपी पैशातून नको त्या व्यक्तींना ठेका दिला जात आहे. जाणूनबुजून वाढीव दराने कंत्राट काढले जात आहे. त्यामध्ये फक्त ठेकेदारांना पोसण्याचा धंदा केला जात आहे. इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा भाजपाने स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.















