न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च २०२०) :- गहुंजे, मावळ भागातील सांगवडे येथील महेश लिमन या शेतक-याच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांना ऊस तोडत असताना बिबट्याची दोन पिल्ले ( बछडे ) आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज मंगळवारी (दि. ३ ) सकाळी सांगवडे येथील शिवारात महेश लिमन यांच्या शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना उसात बिबट्याची दोन पिल्ले असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तातडीने लिमन यांना कळविले. लिमन यांनी मावळचे वन विभागास कळविल्यानंतर मावळचे परिक्षेत्र वन अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्यासह वन विभागाचे संबंधित सर्व कर्मचारी या भागात दाखल झाले. वन विभागामार्फत आई व दोन्ही पिल्लाची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याचे ताकवले यांनी सांगितले आहे.
सांगवडे भागातील शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्याने शेतकरी भयभीत झाले असून शेतक-यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.











