न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२०) :- आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी (सोमवारी) येस बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दोन वर्षांपासून येस बँकेशी व्यवहार केला आहे. महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा येस बँकेत जमा होत आहे. महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचा-यांच्या वेतनासाठी केला जातो. ठेकेदारांना मोबदला दिला जातो. तो मार्च २०२० पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे.
परंतु, महापालिकेचे येस बँकेत ९८४.२६ कोटी अडकले आहेत. बँकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या ‘कॅशफ्लो’वरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे ९८४.२६ कोटी तातडीने अदा करावेत. बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेतील महापालिकेच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी विनंती आयुक्त हर्डीकर यांनी येस बँकेचे प्रशासक कुमार यांच्याकडे (सोमवारी) पत्राद्वारे केली आहे.















