न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- देहूमध्ये तुकाराम बीज सोहळा बुधवारी संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वैष्णव बीज सोहळ्यास उपस्थित होते. परंतु, यंदाची तुकाराम बीज करोनाच्या सावटाखाली संपन्न झाली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक – एस पी ओ आरोग्यदूतांनी देहूरोड पोलीस प्रशासनास सहकार्य केले.
ह्या वर्षी चिंतेच्या वातावरणातच तुकाराम बीज सोहळा साजरा झाला. दोनच दिवसापूर्वी पुण्यात कोरोना पीडितांची नोंद झाल्यामुळे आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन सजग व सतर्क झाले. पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिसर व पुणे शहरात कार्यरत असणारे पोलीस मित्र – विशेष पोलीस अधिका-यांनी मोलाची मदत प्रशासनास दिली. तसेच सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या वारकरी भाविकांना कोरोना संसर्गजन्य आजाराची माहिती दिली. तसेच; स्वच्छतेबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले व सावधानता बाळगण्यास सांगितली.
या प्रसंगी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले,” देहू हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व विठ्ठल भक्तांचे प्रसिद्ध असे तिर्थक्षेत्र आहे. आषाढी पालखी सोहळा व तुकाराम महाराज बीज सोहळा हे प्रमुख धार्मिक सोहळे दरवर्षी साजरे होत असतात. त्या पार्श्वभूमीवर वैष्णवांची योग्य सेवा घडण्यासाठी पोलीस विभाग सुसज्ज असतो आणि त्याबरोबरच पोलीस मित्र – एसपीओ ची मोलाची मदतही आम्हास मिळत असते. त्यांनी केलेले सहकार्य नक्कीच प्रशासनास मोलाचे ठरते.”
समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, समीर चिले, तेजस सापरिया, अजय लुगडे, जयेंद्र मकवाना यांनी वैष्णवांची सेवा करण्यास विशेष योगदान दिले. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सय्यद पठाण यांनी एसपीओ व आरोग्यदूतानां विभागवार ठिकाणी मार्गदर्शन केले.















