न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.१८/०३/२०२० पर्यंत एकुण ९२ व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. आज दि.१८/०३/२०२० रोजी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला असून उर्वरीत चार व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधील करोना (कोविड १९) या आजाराच्या रुग्णांची संख्या ११ झालेली असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
त्यांचेवर दोन्ही रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडणेत आलेले असून त्यांना घरात क्वॉरनटाईन करण्यात आलेले आहे. आज करोना पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा फिलिपिन्स येथुन प्रवास करुन पुणे शहरात आलेला आहे. त्याच्या
सहवासितांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. आज दि.१८/०३/२०२० रोजी एकुण १२ व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
तसेच श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथील वसतीगृहांमध्ये ५०० क्वॉरनटाईन बेड्सची व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच (Home Quarantine) राहणेकरीता पिंपरी चिंचवड मनपाचे वतीने पुनश्च: आवाहन करण्यात येत आहे.
पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित करोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.















