- जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या; गर्दी टाळा; माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- वाकडमधील कस्पटे वस्ती व परिसरात आयटी क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. कामानिमित्त परदेशवारी करणाऱ्यांची संख्याही या परिसरात जास्त आहे. त्यामुळे परिसरात कोरोनाच्या धर्तीवर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांची भीती दूर करण्याकरिता विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनने पुढाकार घेऊन, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलेले आहे.
परिसरात निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनचे सदस्य परिसरातील सोसायट्यामध्ये जाऊन औषध फवारणी तसेच, आधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरणाची फवारणीदेखील करीत आहेत.
दरम्यान माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर न पडता वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. तुमच्या सुरक्षेसाठी सर्व सोसायटी व परिसरामध्ये कोरोना व प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतलेली आहे. अहोरात्र हे काम आम्ही चालू ठेवणार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत, उद्या रविवारी घरातच रहा व ठीक पाच वाजता अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या, शांतता पाळा, गर्दी टाळा, असे आवाहन केले आहे.















