न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यातच महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. शिवाय आता रेल्वे प्रवाशांमध्येही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं या संदर्भात काढलेल्या पत्रकानुसार, आतापर्यंत करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि इंटरसिटी ट्रेन्स (प्रिमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स ह्या ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी मध्यरात्रीपासून देशभरातील उपनगरीय रेल्वे सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईची लाइफलाइन असलेली मुंबई व पुणे लोकल इतिहासात पहिल्यांदाच ९ दिवसांसाठी बंद राहणार आहे. याशिवाय कोलकातामधील लोकल, मेट्रो ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहेत.
रविवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यत आपल्या मूळ स्थानावरून निघालेल्या मेल/एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर ट्रेन आपल्या अखेरच्या स्टेशनपर्यंत धावू शकतील. पण त्यानंतर त्याही कॅन्सल करण्यात येतील.















