न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणखी २५ टक्के घट केली आहे. त्यामुळे आज सोमवार (दि. २३) पासून पालिकाभवन व सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयात केवळ २५ टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवरील ताण कमी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई , पुणे , पिंपरी – चिंचवड व नागपूर शहरातील सर्व शासकीय , 5 निमशासकीय व महापालिकाकार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन उपस्थिती २५ टक्के ठेवण्याचे आदेश २० मार्चला दिले आहेत. त्यानुसार पालिकेत केवळ २५ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, अशी सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सोमवार (दि. २२) पासून होणार आहे.
ही सवलत वैद्यकीय, आरोग्य, अग्निशामक, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदी अत्यावश्यक विभागांना लागू राहणार नाही. पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय व इतर कार्यालयात व नागरिक, ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विभागप्रमुखांनी ‘ गेटपास ‘ दिल्याशिवाय संबंधितांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पालिका व क्षेत्रीय कार्यालयातील उपस्थितांची संख्या खूपच कमी झाली आहे.













