न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केलं जातं आहे.
पुण्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यातले काही जण अचानक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी काही पथकं तयार करुन या सगळ्यांचा शोध सुरु केला आहे. पुणे पोलिसांनी या सगळ्यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे.
जर बेपत्ता झालेले हे लोक हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. याबाबत पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही आवाहन केलं आहे. क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती दिसली तर आम्हाला १८००२३३४१३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.













