न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस रेकोर्डवरील आरोपींची माहिती काढून त्यांचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत असताना आरोपी शेख याने सांगवी आणि वाकड परिसरात मागील काही दिवसांपूर्वी घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा रचून रफिक हुसेन शेख (वय २६, रा. ससाणे नगर, हडपसर) याला अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता त्याने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात १२ ठिकाणी घरफोडी तर दोन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून ३६७ ग्राम सोन्याचे दागिने, २७९ ग्राम चांदीचे दागिने, दोन मोटारसायकल असा एकूण १५ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी व वाहनचोरीचे २४ गुन्हे दाखल आहेत. आरोपी दुपारच्या वेळी दुचाकीवरून शहरात फिरून बंद असलेल्या बैठ्या घरांची पाहणी करीत असे. त्यानंतर रात्रीच्या वेळी सायकलच्या स्टॅंडच्या सहाय्याने कडी-कोयंडा तोडून घरफोडी करत असे.
या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यातील एक, वाकड पोलीस ठाण्यातील दोन असे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सहा, हडपसर तीन, सिंहगड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.












