न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- शहरात पहिल्या टप्प्यातच १२ रुग्ण करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पालिकेने जोरदार हालचाली करत शहरातील रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात यश मिळविले होते.
मात्र दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या तबलिगी जमातमधील तीघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून आणखी काही जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तर दहाजण अद्यापही गायब आहेत. यामुळे शहरवासियांमध्ये करोनावरून दहशतीचे चित्र आहे.
महापालिकेकडून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी गरजेच्या वस्तू तसेच मास्क व सॅनिटाईझरची खरेदी सुरू आहे. ही खरेदी आयुक्तांच्या अधिकारात सुरू आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पक्षनेते, स्थायी समिती सभापतींसह महापौर व उपमहापौर या खरेदीबाबत माहिती जाणून घेत असल्याचे समोर आले. मागणी, पुरवठा आणि ठेकेदारांची माहिती घेतली जात असल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे? हे कोणाच्याच लक्षात येत नसल्यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती पहावयास मिळाली.













