न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- प्रशासनाने दिलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम दररोज सुरू आहे. गुरुवारी ( दि. २) रोजी पर्यंत पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १२७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि शहरांच्या देखील सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा सुरु आहेत. त्यांना देखील प्रशासनाकडून विशेष परवानगी घेऊन काम करावे लागत आहेत. बहुतांश ठिकाणी पोलीस यंत्रणा लाठीतंत्राचा वापर करीत आहेत. मात्र, संचारबंदी लागू असताना असताना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घेण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, तसेच विनाकारण सार्वजनिक ठिकाणी घुटमळणे हा गुन्हा आहे.
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येते. गुरुवारी पिंपरी – चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात १२७ जणांवर कारवाई करण्यात आली. कारवाई परिणामकारक व्हावी म्हणून वाकड पोलिसांनी बुधवारी (दि. १) ५० दुचाकी तर गुरूवारी (दि. २) चिखली पोलिसांनी २७ वाहने जप्त केली आहेत.













